Pages

Showing posts with label दु.आ.तिवारी. Show all posts
Showing posts with label दु.आ.तिवारी. Show all posts

Saturday, 1 May 2021

लववेना हे शिर माते ! - दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

“बाळ शिवबा ! तुला आग्रहाने दरबारी नेले
पण तेथे तु सुलतानाला सलाम केला नाही, ऐकते ”!
असे वीरमाता जिजाईने विचारल्या वर
बाल शिवाजी म्हणतात:-


होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट
देनु ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकष्ट
न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट
हा घोर मांडीला ज्यांनी
त्यांचिया पुढे जावोनी
देशाभिमान सोडोनी
प्रेमाच्या मंगल माते !
लववेना हे शिर माते !


तू सांग? तुझ्या चरणाशी हि तोडून ठेवीन मान
तू सांग? तात चरणाशी कापोनी ठेविन मान
गोब्राह्मण यांच्या करिता खड्गावर ठेवीन मान
परि परके सत्ताधारी,
गृही शिरून झाले वैरी
बघतांच तयाना भारी
सक्रोध वृत्ती मम होते
लववेना हे शिर माते !


मी म्हणता ‘नाही नाही दरबारी नेले आई !
जो आत शिरोनी पाही तो चढून गेली भुवई !
मुजरयाला हात न वाही शिर लववू शकलो नाही.
हे सिंहासन कोणाचे ?
हे वैभव तरी कोणाचे ?
काहूर मनी प्रश्नाचे
अपहारी नृपसत्तेते
लववेना हे शिर माते !


ऐकटाच रात्री बसतो मी जन्म्भूस आठवतो !
ढळाढळा आई गे ! रडतो त्वेषाने क्षणि संचारतो !
झोपेत देशबंधुंच्या दुख्खाने दचकून उठतो ! ! !
बोलते भवानी “ उठ ? ”
बोलते जन्मभू “उठ ? ”
“धर समशेरीची मूठ ! ”
अवमानून त्या आज्ञेते
लववेना हे शिर माते !


देशाचा राजा नाही, राजनिष्ठ राहू कैसा ?
धर्माचा राजा नाही, राजभक्त होऊ कैसा ?
या उलट्या बोध-गळाते जीवनाचा अडके मासा !
ज्या शिरी भार देशाचा
ज्या शिरी भार धर्माचा
कर्तव्ये वाहायचा
विसरून देशधर्माते
लववेना हे शिर माते !



स्वाभिमान सुटला ज्यांचा देशभक्ती सुटली ज्यांची
कुलकीर्तीचा इतिहास स्मृती देईन उज्वलतेची
वाढवोत ते ते शोभा दास्याच्या दरबाराची
“उद्दाम ”म्हणो कुणी माते
कि करोत उपहासाते
परि जागोनि स्वत्वाते
हिंदू द्वेषी तख्ताते
लववेना हे शिर माते !


सुलतान जाहला क्रुध्द, उमराव जाहले क्रुध्द
जातिवंत झाले स्तब्द, जनकही होय हतबुध्द
परि तुझी आणि अंबेची, शिरी कृपा असावी शुध्द
मावळचे जमवून भाई
स्थापीन मराठेशाही
हलवीन आदिलशाही
बोलतो सत्य जे गमते
लववेना हे शिर माते !

Sunday, 1 December 2019

संताजीची घोडदौड - दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

तळहातीं शिर घेउनिया, दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगल सेना, ना नामोहरम जहाली
पडली मिठि रायगडाला, सोडवितां नाहीं सुटली
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेऊन
परते सरसेनापतिची, घोडदौड संताजीची ||१||


मिरजेवर पातशहाचीं, शहाजणें वाजत होतीं
हाणिल्या तयांवर टापा, फोडून टाकिलीं पुरतीं
मारिली टांच तेथून, घेतला पन्हाळा हातीं
तों कळलें त्या वीराला
जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
चौखूर निघे त्वेषाची, घोडदौड संताजीची ||२||


झुल्फिकारखां लढवय्या, कातरली झुल्फे त्याची
धूळधाण केली तेथे, किती अमीर उमरावांची
उसळली तेथून मांड,मग त्या कर्दन काळाची
जिंजीचा धुराळा मिटला
जालना प्रांती तो उठला
चोळीतो क्षत्रू नेत्राला
गेली हां हां म्हणतांची, घोडदौड संताजीची ||३||


वाजल्या कुठें जरि टापा, धुरळ्याची दिसली छाया
छावणींत गोंधळ व्हावा ‘ संताजी आया ! आया ! ’
शस्त्रांची शुद्धे नाहीं, धडपडती ढाला घ्याया
रक्तानें शरिरें लाल
झोंपेनें डोळे लाल
जीवाचे होती हाल
ऐशी शत्रूला जाची घोडदौड संताजीची ||४||


गिरसप्पा “ धों धों ” वाहे, प्रतिसारिल त्याला कोण ?
शिशिराचा वारा“ सों सों ” रोधील तयाला कोण ?
हिमशैल खंड कोसळतां प्रतिरोधिल त्याला कोण ?
होता जो गंगथडीला
आला तओ भीमथडीला
एका दिवसांत उडाला
करि दैना परसेनेची घोटदौड संताजीची ||५||


पुरताच बांधिला चंग, घोड्यास चढविला तंग
सोडी न हयाचे अंग, भाला बरचीचा संग
नौरंगाचा नवरंग, उतरला जहाला दंग
तुरगावर जेवण जेवी
तुरगावर निद्रा घेई
अंग न धरेला लावी
भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची ||६||


संचरलें होतें न कळे, तुरगासहि कैसें स्फुरण
उफळाया बघती वेगें, रिकिबींत ठेवितां चरण
जणुं त्यासहि ठावे होतें, युद्धें “ जय कि मरण ”
शत्रूचे पडतां वेढे
पाण्याचे भरतां ओढे
अडती न उधळती घोडे
ऐशी चाले शर्तीची, घोडदौड संताजीची ||७||


नेमानें रसद लुटावी, “नेमाजी शिंदे” यांनीं
सांपडती हयगज तितुके, न्यावे “हैबतरावांनीं”
वाटोळे सर्व करावे, “आटोळे” सरदारांनी
“ खाड खाड ” उठती टापा
झेंपावर घालित झेपा
गोटावर पडला छापा
आली म्हणती काळाची, घोडदौड संताजीची ||८||


चढत्या घोढ्यानिशी, गेला बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलाणांत, ओली न पुशी समशेर
बसवितो जरब शत्रूला, बेजरब रिसालेदार
वेगवान उडवित वाजी
तोंडावर लढतो गाजी
धांवून आला संताजी
पळती मोंगल बघतांची, घोडदौड संताजीची ||९||


नांवाचा होता ‘ संत ’ - जातीचा होता शूर
शीलाचा होता ‘ साधू ’ - संग्रामीं होता धीर
हृदयाचा ‘ सज्जन ’ होता, रणकंदनिं होता क्रूर
दुर्गति संभाजीची
दैना राजारामाची
अंतरीं सर्वदा जाची
उसळे रणशार्दूलाची, घोडदौड संताजीची ||१०||


मर्दानी लढवय्यांनीं, केलेल्या मर्दुमकीचीं
मर्दानी गीतें गातां, मर्दानी चालीवरचीं
कडकडे डफावर थाप, मर्दानी शाहीराची
देशाच्या आपत्कालीं
शर्थीचीं युद्धें झालीं
गा शाहीरा, या कालीं
ऐकूं दे विजयश्रीची, घोडदौड संताजीची ||११||

~कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून 

Saturday, 7 November 2015

मोहरा इरेला पडला - दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी


बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून 
-