Pages

Showing posts with label आठवणीतल्या कविता. Show all posts
Showing posts with label आठवणीतल्या कविता. Show all posts

Sunday, 28 June 2026

आई — कवी यशवंत

'आई' म्हणोनी कोणी, आईस हाक मारी,

ती हाक येई कानी, मज होय शोककारी.
नोहेच हाक, माते! मारी कुणी कुठारी;
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी.
ही न्यूनता सुखाची चित्ती सदा विदारी;
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी॥

चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई,
गोठ्यात वासरांना या चाटतात गाई.
वात्सल्य हे पशूंचे मी रोजरोज पाहे;
पाहून अंतरात्मा व्याकूळ मात होई.
वात्सल्य माउलीचे आम्हा जगात नाही;
दुर्भाग्य याविना का आम्हास नाही आई॥

शाळेतुनी घराला येता धरील पोटी,
काढून ठेवलेला घालील घास ओठी.
उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती;
कोण तुझ्याविना गे का या करील गोष्टी?
तुझ्याविना गे कोणी लावील सांजवाती?
सांगेल ना म्हणाया आम्हा "शुभं करोति"॥

ताईस या कशाची जाणीव नाही काही;
त्या सान बालिकेला समजे न यात काही.
पाणी तटावरुनी नेतात बावरे ही;
ऐकून घे, परंतु आम्हास नाही आई.
सांगे तसे मुलींना, "आम्हास नाही आई";
ते बोल येत कानी, "आम्हास नाही आई"॥

आई, तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे,
माहेर मंगळाचे, अद्वैत तापसांचे.
गांभीर्य सागराचे, औदार्य या धरेचे;
नेत्रांत तेज नाचे त्या शांत चंद्रिकेचे.
वास्तव्य या गुणांचे, आई, तुझ्यात साचे॥

गुंफुनी पूर्वजांच्या मी गाइले गुणांना;
साऱ्या सभाजनांनी या वंदिल्या कृतीला.
आई, करावया तू नाहीस कौतुकाला;
या न्यूनतेमुळे ही मज त्याज्य ही पुष्पमाला.
पंचारती जनांची ना तोषवी मनाला;
पाही जीव बालकाचा तव कौतुका भुकेला॥

येशील तू घराला परतून केधवा गे?
दवडू नको घडीला, ये, ये निघून वेगे.
हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याच धागे;
कर्तव्य माउलीचे करावयास येई वेगे.
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे;
ये रागवावयाही, परि येई, येई वेगे॥

- यशवंत

सहानुभूती - कुसुमाग्रज

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी।

प्रभादिपांची फुले अंतराळी,
दौलतीची नित चालते दिवाळी।

कोपऱ्याशी गुणगुणत अन् अभंग,
उभा केव्हाचा एक तो अपंग।

भोवतीचा अंधार जो निमाला,
हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला।

जीभ झालेली ओरडुनी शोष,
चार दिवसांचा त्यातही उपास।

नयन थिजले, थरथरती हातपाय,
रूप दैन्याचे उभे मूर्त काय?

कीव यावी पण तयाची कुणाला?
जात उपहासुनी पसरल्या कराला।

तोचि येई कुणी परतुनी मजूर,
बघुनी दीना त्या उभारुनी ऊर।

म्हणे, "राहीन दीन एक मी उपाशी,
परि लाभू दे दोन घास त्यासी."

खिसा ओतुनी त्या मुक्या ओंजळीत,
चालू लागे तो दिनबंधू वाट।

आणि धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात॥

- कुसुमाग्रज



Sunday, 2 May 2021

इन्द्र जिमि जंभ पर - कविराज भूषण

कविराज भूषण यांची ब्रज भाषेतील हि कविता आपण बर्याच वेळा ऐकली आहे. माझी आठवण सांगायची तर स्टार-प्रवाहवर २००८ पासून सुरु असलेल्या राजा शिवछत्रपती ह्या मालिकेचा title track हा ह्या गीताने सुरु व्हायचा. तेव्हापासून हे गीत मला पाठ आहे, मात्र त्याचा नेमका अर्थ कळायला बरीच वर्ष गेली. काही दिवसांपूर्वी दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी आणि रणजीतराव हिर्लेकर यांनी त्याचे मराठीत कविता रुपात केलेले भाषांतर सापडले. तेच आज post करतोय.


इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।

पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥

दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥

- कविराज भूषण

प्रथम याचे प्रत्येक शब्दश: मराठी रूपांतरण बघूया.

[इंद्र जिमि जम्भ पर]
जसा इंद्र जम्भासुरावर (माझलेल्या हथ्थी रूपात),

[बाड़व सुअम्ब पर]
जस वादळ आकाशावर

[रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं]
जसा राम माझलेल्या दंभी रावाणावर ||१||

[पौन बरिवाह पर]
जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,

[संभु रतिनाह पर]
जसा शंकर रतीच्या पतीवर (मदनावर)

[ज्यो सहसबाह पर रामद्विजराज हैं]
जसा परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर ||२||

[दावा द्रुम दंड पर]
जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,

[चीता मृग झुंड पर]
जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,

[भूषण वितुंड पर जैसे भृघराज हैं]
जश्या भल्या मोठ्या हथ्थिवर सिंह हल्ला करतो ||३||

[तेज तमअंस पर]
जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,

[कान्ह जिमि कंस पर]
कृष्ण कंसाचा नाश करतो,

[त्योम म्ल्लेंछ बंस पर सेर सिवराज हैं ]
तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी
(मोघल, आदिलशाह, निजामशाह) यांचा नाश करणारा वाघ आहेस.


रणजीतराव हिर्लेकर यांनी केलेला मराठी पद्यानुवाद

जंभासुर दैत्यांवर इंद्र वज्र फेकतो
सिंधुसागरात आग वडवानल ओकतो
दंभी रावणापुढे राम उभा ठाकतो
तुर्कांवर शिवराजा खड्ग तसा घालतो ||1||

जलद जाती पळत पळत प्रगटताच वायु तो
जितेंद्रीय शंकरास तुच्छ मदन बाण तो
शत शत बाहुंस तोडी परशुने राम तो
तुर्क, हशबी, मोंगलांस तैसा शिव तोडतो ||2 ||

सिंह जसा हत्तीचे गंडस्थळ फोडतो
चित्याची झेप हीच हरणांना पेच तो
प्रगटता क्षणी करी वनास खाक अग्नी तो
समरांगणी शिवराजा विर तसा शोभतो ||3||

तेज प्रगटता घनांधकार नष्ट पावतो
कृष्ण चिंतनात कंस मरण रोज भोगतो
महंमदीय वंशाला काळ असा भासतो
सिंहासम छत्रपती शिवराजा शोभतो ||4||

-रणजित रमेश हिर्लेकर , कुणकेश्वर

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी  केलेला मराठी पद्यानुवाद

जंभावरी इंद्र, लंकापतीच्यावरी की जसा जानकीचा पती

मेघावरी वायु, कामावरी की महादेव - ज्याची तपाची रती

दु:शासनाच्या वरी भीम किंवा कन्हय्या जसा दुष्ट कंसावरी

हा भोसले- भूप गाझी शिवाजी तसा भूतली म्लेंच्छ वंशावरी

Monday, 9 April 2018

गाणे व्यर्थची कुल थोरवी - बेहरे

तडित कडाडे उपजे काळ्या कभिन्न मेघोदरी
म्हणुनी का वीज नसे साजरी?
महाविषारी असे खरोखर नागाची ती फणी
म्हणुनी का गरलच वरचा मणी? ||१||

पंकापोटी जन्म पाऊनी सौंदर्ये शोभते
म्हणुनी का कमळ तुच्छ वाटते?
सुरासुरांनी भांडण करुनी सागरास मंथीले
म्हणुनी का अमृत हे नासले? ||२||

शिळा वाळुनी मूळ मुर्तीपरी पंढरीस नांदते
म्हणुनी का भक्ती मंदावते?
जन्मा येणे देवाहाती करणी जग हासवी
गाणे व्यर्थची कुल थोरवी...||३||

***

~ तडित = वीज, गरल = विष, पंक = चिखल; 
~सुरासुरा = सुर-असुर (देव-दानव); शिळा = दगड

Thursday, 5 April 2018

वेडात मराठे वीर दौडले सात - कुसुमाग्रज


वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

"श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील"
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ३ ॥

"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ८ ॥

Image Source -- http://anuragchivilkar.blogspot.in/2012/03/tribute-to-veer-senapati-prataprao.html

जालियनवाला बाग - कुसुमाग्रज


रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
“प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !”
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

कवी – कुसुमाग्रज

सहानभूती - कुसुमाग्रज


उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी
प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात
***

कवी – कुसुमाग्रज

Tuesday, 11 March 2014

प्रेमयोग (Premyog) ~ कुसुमाग्रज


प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....



सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं



रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं



प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं



प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............

~कुसुमाग्रजं

Monday, 10 March 2014

कृतज्ञता - गिरीश


पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरताच तडफडावे.
पाखराने एकले तडफडावे.
हळू गोंजारी सेविका दयाळू
डॉक्टराचे वच शंतवे कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न
कुठे डोळे लाउन बसे खीन्न
आणि डाक्टर येताच गोंजाराया
हाय! लागे तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकुळ फार झला
आणि पुसिलेच त्याने डाक्टरला
''आता दादा, मरणार काय मी हो?''
तोच लागे अश्रुची धार वाहो!

ह्रदय हलूणी डोळ्यात उभे पाणी
तरी डाक्टरची वदे करूण वाणी
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजरून शांतावुन जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास आता ताण
हळूच बोलावी बाळ डाक्टराला
तोही धर्मात्मा धाऊनीच आला.

आता बाळाला टोचणार तोच
वेड वासून पाखरू दीन चोच
"नको आता ! उपकार फार झाले!
तुम्ही मजला किती..गोड..वागविले!

भीत..दादा..मरणास मुळी..नाही!
तू..म्ही..आई..!!" बोलला पुढे नाही!
क्षणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचणे डाक्टराने.

-

कवी : गिरीष