Pages

Wednesday, 25 March 2026

या नदीच्या पार वेड्या...- कवी बा भ बोरकर

या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे

मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेष आहे
केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे

मखमली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे
चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे

धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे
नाचरा आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे

तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे
सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे

तेथे जाया वेगवेडी पारिजाताची वाट आहे
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे

---- कवी बा भ बोरकर

No comments:

Post a Comment