Pages

Sunday, 28 June 2026

सहानुभूती - कुसुमाग्रज

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी।

प्रभादिपांची फुले अंतराळी,
दौलतीची नित चालते दिवाळी।

कोपऱ्याशी गुणगुणत अन् अभंग,
उभा केव्हाचा एक तो अपंग।

भोवतीचा अंधार जो निमाला,
हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला।

जीभ झालेली ओरडुनी शोष,
चार दिवसांचा त्यातही उपास।

नयन थिजले, थरथरती हातपाय,
रूप दैन्याचे उभे मूर्त काय?

कीव यावी पण तयाची कुणाला?
जात उपहासुनी पसरल्या कराला।

तोचि येई कुणी परतुनी मजूर,
बघुनी दीना त्या उभारुनी ऊर।

म्हणे, "राहीन दीन एक मी उपाशी,
परि लाभू दे दोन घास त्यासी."

खिसा ओतुनी त्या मुक्या ओंजळीत,
चालू लागे तो दिनबंधू वाट।

आणि धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात॥

- कुसुमाग्रज



No comments:

Post a Comment