Pages

Sunday 5 October 2014

पुजार्यांचे कसब

तीन दिवसांपूर्वी  मी जगन्नाथ पुरी ह्या चार धामांपैकी एका धामाला भेट देऊन आलो. पुरीबद्दल अनेक कथा, त्याचं महात्म्य आपण ऐकलचं असेल, नसेल ऐकलं तरी ते विकिपीडिया किंवा अन्यत्र कुठेही मिळेल. पण मी ह्या सगळ्याची चर्चा ईथे करणार नाहीये. तर मी स्वानुभवातून माझं पुरी ह्या स्थानाला भेट देण्याविषयी काय मत आहे, ते तुम्हाला सांगणार आहे.

कोणतेही भारतातील देवस्थान म्हटले की तीन गोष्टी प्रकर्षाने असणार –भक्त, देवस्थानातील घाण आणि पुजार्यांचा सुळसुळाट. आता तुम्ही म्हणाल, बिर्ला मंदिर किंवा इस्कॉनच्या मंदिरात घाण कुठे असते राव? पण तेवढे काही अपवाद वगळले (अर्थात त्या देवस्थानांवर धनाड्यांचा मोठा हात आणि उद्योग दोन्हीही असतात) तर कुठल्याही कुठल्याही देव्स्थानावरील ही अतिशय कॉमन गोष्ट आहे.
हे लिहिण्यात असं नवीन जे तुम्हाला माहीत नाही असं काहीच नाहीये. पण माझी ह्या स्थानाला भेट जी काही पुजार्यांमुळे खराब झाली, हा कदाचित त्याचा उद्रेक असावा. मंदिराचं बांधकाम आणि स्थापत्य हे बाहेरून अतिशय उत्कृष्ट आहे. मंदिरामध्ये पाय ठेवताच किंबहुना बाहेरूनच आपल्याला पाच-सहा पुजारी (तिकडे त्यांना ‘पंडे’ म्हणतात) घोळका घालतात. ऐखाद्या पर्यटनस्थळी ज्याप्रमाणे ट्रॅवल एजंट घोळका घालतात अगदी त्या प्रमाणे. पूजा करून घेण्यासाठी त्यांचा आग्रह अतीटोकाचा. चार पावले त्यांना दाद दिली नाही तर २०० रुपाची पूजा ५० रुपयावर येऊन ठेपते. जर तरीही आपण बधलो नाही तर ते त्याचं शेवटचं हत्यार काढतात –ब्राम्हणाचा शाप. म्हणजे नीचपणा जो म्हणतात त्याची सीमा कोण पहिले ओलांडेल याच्या शर्यतीत ही मंडळी बर्याच वरच्या स्थानावर येतील.

म्हणजे त्यांच्याकडून पूजा करून घेतली नाही तर इतके अप्रतिम मंदिर आपल्याला पाहण्याचा आनंदही ही मंडळी घेऊ देणार नाहीत. पूर्णवेळ आपल्या पाठोपाठ येऊन त्यांची पुजेची, त्यातून मिळणाऱ्या समृद्धीची, जर नाही केल्यास मिळणाऱ्या पापाची अखंड कीटकीट ते लावणार.

नवीन प्रकार ह्या ठिकाणी मला जो पाहायला मिळाला तो हा की, देवदर्शनासाठी आपल्याला प्रत्येकी ५० रुपये मोजावे लागतात. असला प्रकार जी मंदिरे फक्त उद्यागासाठी बांधलेली आहेत त्या ठिकाणीही मी पाहिलेला नाही. आश्चर्याचा भाग तर हा झालाच पण मजा तर अजून पुढच्या गोष्टीत आहे. ५० रुपयाचे स्वत:च्या इच्छेविरुद्ध (आता आलोच आहोत तर पाहून घेवूयात) ह्या भावनेने तिकीट काढल्यावर आतील गाभार्यात प्रवेश केल्यावर संपूर्ण जमीन ही तेलाने भरलेली. देवापेक्षा संपूर्ण लक्ष हे तोल सांभाळण्यात.

आता मूर्तीला नमस्कार करून प्रदक्षिणा मारत असताना एकदम हे पंडित लोक आपला खांदा पकडतात आणि दक्षिणा मागतात. जोपर्यंत दक्षिणा देत नाही तोपर्यंत ते काही तुमचा खांदा सोडत नाही. अशावेळी आपल्याला झक मारून ही दक्षिणा द्यावीच लागते. (अगदी तुलना करायची झाली तर रेल्वेत हिजडयाला ज्याप्रमाणे ब्याद टाळण्यासाठी देतो त्याप्रमाणे...) त्यांची खांद्यावरची पकडही अतिशय मजबूत. भिक्षावली करूनही चांगली शरीरयष्टी कमावता येते तर. अशाप्रकारे तुमचा पूर्णवेळ मानसिक बलात्कार झाल्यावर काय मंदिराचा परिसर पाहण्याची इच्छा होणार?

अजून एक प्रसंग सांगायचा झाला तर मी कालच परिवारासोबत कलकत्त्याला कालीघात मंदिरात जाऊन परतलो. ‘जाऊन परतलो’ याचा अर्थ म्हणजे दर्शन न घेताच परतलो. तसा मी देवदर्शन, मंदिर यांच्या विरुद्ध असलो तरी परिवारासोबत त्यांच्या इच्छेसाठी एखाद्या पर्यटनस्थळाला भेट द्यावी त्याप्रमाणे मी जातो. तर गोष्ट अशी झाली की आम्ही कालीघात मंदिरात पोहचलो. नाव्रत्रीमुळे गर्दी बरीच होती आणि अतिशय लांब रांग.

ही रांग कटवण्यासाठी पुजारी रांगेत असलेल्यांकडून २००, १००० अशाप्रकारे पैसे घेऊन सरळ मधल्या गाभार्यात घेऊन जातात. देवाच्या दरातही भ्रष्टाचार.हे पाहून आम्ही रांगेत उभे राहिलो, तरी दर २ मिनिटात एक एक पुजारी येऊन एकच प्रश्न, “साब बहोत वक्त लगेगा, तीन लोगोका ५० करके १५० देदो. १० मिनिट में हो जायेगा.” आता मी त्यांना विचारलं की कसकाय घेऊन जाणार? तर तो त्याचं गळ्यात घातलेलं कार्ड दाखवून म्हणतो कि आम्हाला परवानगी आहे. त्यावर मी त्याला विचारलं कि तुला असेल परवानगी, पण तुझ्याबरोबर १० लोक घेऊन जाण्याची कोणती परवानगी आहे? आता ह्या तीनही लोकात श्रेष्ठ म्हणवणारी ही कावळे मंडळी जाब विचारल्यास आपल्याला पापाची धमकी देणार. अहो पाप लागुद्यात, शाप द्या मात्र पहिल्याने उत्तर द्या. पण ते नाहीच. मग आम्ही निर्णय घेतला की दर्शन न घेताच परत चालायचं. हा देव ज्या दिवशी रांगेत उभे राहणार्यांना बोलायला आणि ह्या देवाच्या दलालांना रोकायला, प्रश्न विचारण्याची सुबुद्धी देईल त्यादिवशी कदाचित येवूयात. त्या रांगेत अनेक तास उभे राहून आमची बरीच प्रेक्षणीय स्थळे राहिली असती, ती तरी देवाचे दर्शन न घेण्याची सुबुद्धी (देवानेच दिली म्हणूयात) झाल्यामुळे वाचली.

जर सुटी म्हणून कुठे वेळ घालवायचा असेल तर देवाची ठिकाणे सोडून कुठलेही निवडा. वेळ निवांत जाईल. :-)