Pages

Sunday 1 December 2019

उतुंग आमुची उत्तर सीमा - वसंत बापट


उतुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवूं
अभिमान धरुं, बलिदान करूं, ध्वज उंच उंच चढवूं ll ध्रु.ll

परक्यांचा येता हल्ला,
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड,
होतील इथें ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवूं ll १ll

बलवंत उभा हिमवंत,
करी हैवानाचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रुंची आली, खिंड खिंड लढवूं ll २ll

जरी हजार अमुच्या ज़ाती
संकटामधें विरघळती
परचक्र येतसे जेव्हां,
चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवूं ll ३ll

राष्ट्राचा दृढ निर्धार,
करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतील रक्त,
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू ll 4ll

अन्याय घडो शेजारी,
की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ,
स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू ll 5 ll

- वसंत बापट

बीज अंकुरे अंकुरे - मधुकर पांडुरंग आरकडे

बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?

~मधुकर पांडुरंग आरकडे 

पाळींव पोपटास - काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)

हे डाळिंबाचे दाणे वेड्या ! घात तुझा करिती ll ध्रुo ll

कवटी तूं कवठावरली
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यां​वरती ll १ ll

मालक तव हौशी फार
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ll २ ll

चैनींत घेत गिरक्यांसी
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
फळ दिसेल ते फोडावें
ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं ll ३ ll

चाहिल तें झाड बघावें
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
मग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती ll ४ ll

कितितरी फळें पाडाचीं
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पिंजऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती ll ५ ll

पूर्वीची हिंमत गेली
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं ll ६ ll

येतांच धनी नाचावें
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं ll ७ ll

हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
पिंजऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती ll ८ ll

हा अध:पात तव झाला
डा​​ळिंबची कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंजऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं ll ९ ll

— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)

गोपनारी हिरकणी गडा गेली

गोपनारी हिरकणी गडा गेली
दूध घालाया परत झणी निघाली
पायथ्याशी ते वसे तीचे गाव
घरी जाया मन घेई पार धाव ll ध्रु ll

शिवप्रभुंचा निर्बंध एक होता
तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता
सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे
कुठे कोणा जाऊ-न-येऊ द्यावे ll १ ll

सर्व दरवाजे फिरून परत आली
तिला भेटे ना तेथ कुणी वाली
कोण पाजील तरी तान्हुल्यास आता
विचारे या बहुदु:ख होय चित्ता ll २ ll

मार्ग सुचला आनंद फार झाला
निघे वेगे मग घरी जावयाला
नसे रक्षक ठेविला जेथ ऐसा
तेथ होता पथ रायागादी खासा ll ३ ll

गडा तुटलेला कडा उंच नीट
घरी जाया उतरली पायवाट
पाय चुकता नेमका मृत्यु येई
परी माता ती तेथुनीच जाई ll ४ ll

उतरू लागे मन घरी वेधलेले
शुद्ध नाही जरी तनुस लागलेले
अंग खरचटलेले वस्त्र फाटलेले
अशा वेषे ती घराप्रती चाले ll ५ ll

वृत्त घडले शिवभूप कर्णि जाता
वदे आनंदे धन्य धन्य माता
कड्या वरती त्या बुरुज बंधियेला
नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला ll ६ ll

~अज्ञात 

संताजीची घोडदौड - दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

तळहातीं शिर घेउनिया, दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगल सेना, ना नामोहरम जहाली
पडली मिठि रायगडाला, सोडवितां नाहीं सुटली
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेऊन
परते सरसेनापतिची, घोडदौड संताजीची ||१||


मिरजेवर पातशहाचीं, शहाजणें वाजत होतीं
हाणिल्या तयांवर टापा, फोडून टाकिलीं पुरतीं
मारिली टांच तेथून, घेतला पन्हाळा हातीं
तों कळलें त्या वीराला
जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
चौखूर निघे त्वेषाची, घोडदौड संताजीची ||२||


झुल्फिकारखां लढवय्या, कातरली झुल्फे त्याची
धूळधाण केली तेथे, किती अमीर उमरावांची
उसळली तेथून मांड,मग त्या कर्दन काळाची
जिंजीचा धुराळा मिटला
जालना प्रांती तो उठला
चोळीतो क्षत्रू नेत्राला
गेली हां हां म्हणतांची, घोडदौड संताजीची ||३||


वाजल्या कुठें जरि टापा, धुरळ्याची दिसली छाया
छावणींत गोंधळ व्हावा ‘ संताजी आया ! आया ! ’
शस्त्रांची शुद्धे नाहीं, धडपडती ढाला घ्याया
रक्तानें शरिरें लाल
झोंपेनें डोळे लाल
जीवाचे होती हाल
ऐशी शत्रूला जाची घोडदौड संताजीची ||४||


गिरसप्पा “ धों धों ” वाहे, प्रतिसारिल त्याला कोण ?
शिशिराचा वारा“ सों सों ” रोधील तयाला कोण ?
हिमशैल खंड कोसळतां प्रतिरोधिल त्याला कोण ?
होता जो गंगथडीला
आला तओ भीमथडीला
एका दिवसांत उडाला
करि दैना परसेनेची घोटदौड संताजीची ||५||


पुरताच बांधिला चंग, घोड्यास चढविला तंग
सोडी न हयाचे अंग, भाला बरचीचा संग
नौरंगाचा नवरंग, उतरला जहाला दंग
तुरगावर जेवण जेवी
तुरगावर निद्रा घेई
अंग न धरेला लावी
भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची ||६||


संचरलें होतें न कळे, तुरगासहि कैसें स्फुरण
उफळाया बघती वेगें, रिकिबींत ठेवितां चरण
जणुं त्यासहि ठावे होतें, युद्धें “ जय कि मरण ”
शत्रूचे पडतां वेढे
पाण्याचे भरतां ओढे
अडती न उधळती घोडे
ऐशी चाले शर्तीची, घोडदौड संताजीची ||७||


नेमानें रसद लुटावी, “नेमाजी शिंदे” यांनीं
सांपडती हयगज तितुके, न्यावे “हैबतरावांनीं”
वाटोळे सर्व करावे, “आटोळे” सरदारांनी
“ खाड खाड ” उठती टापा
झेंपावर घालित झेपा
गोटावर पडला छापा
आली म्हणती काळाची, घोडदौड संताजीची ||८||


चढत्या घोढ्यानिशी, गेला बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलाणांत, ओली न पुशी समशेर
बसवितो जरब शत्रूला, बेजरब रिसालेदार
वेगवान उडवित वाजी
तोंडावर लढतो गाजी
धांवून आला संताजी
पळती मोंगल बघतांची, घोडदौड संताजीची ||९||


नांवाचा होता ‘ संत ’ - जातीचा होता शूर
शीलाचा होता ‘ साधू ’ - संग्रामीं होता धीर
हृदयाचा ‘ सज्जन ’ होता, रणकंदनिं होता क्रूर
दुर्गति संभाजीची
दैना राजारामाची
अंतरीं सर्वदा जाची
उसळे रणशार्दूलाची, घोडदौड संताजीची ||१०||


मर्दानी लढवय्यांनीं, केलेल्या मर्दुमकीचीं
मर्दानी गीतें गातां, मर्दानी चालीवरचीं
कडकडे डफावर थाप, मर्दानी शाहीराची
देशाच्या आपत्कालीं
शर्थीचीं युद्धें झालीं
गा शाहीरा, या कालीं
ऐकूं दे विजयश्रीची, घोडदौड संताजीची ||११||

~कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून