Pages

Friday 21 March 2014

राम आणि युधिष्ठीर


राम –मर्यादापुरुषोत्तम, आज्ञाधारक मुलगा, महान योद्धा, उत्तम राजा, प्रजेचा लाडका.
युधिष्ठीर –धर्माच्या आचरणात कधीही कसूर न करणारा.
असे जगावेगळे सर्व गुण असताना मला खटकते ती एक गोष्ट. दोन्हींनी आपल्या स्री वर अन्याय केला. धर्माच्या दृष्टीने तुम्ही कितीही वादविवाद करून तुमची बाजू मांडा, पण मला दोन्ही स्रीयांवर अन्याय झाल्यासारखा वाटतो.

का म्हणून मार्यादापुरुषोत्तम रामाने सीतेला अग्निपरीक्षेतून जायला लावलं? मुळातच रामाचा जर कोणावर जास्त विश्वास होता, ती होती सीता. त्याला मुळातच तिच्यावर काडीमात्र संशय नव्हता. पण माझा प्रश्न हा आहे की, का म्हणून समाजाच्या होऊ शकणार्या उपेक्षेला राजा भ्यायला? का म्हणून सर्वांचा आदर्श असलेल्या रामाने सीतेला अग्निदिव्यातून जायला लावले? एवढयावरच गोष्ट संपली असती तरी मी मानली असती तुमची बाजू. मात्र पुन्हा सीतेचा त्याग. त्याही एका यःकिंचित धोब्याने उत्पन्न केलेल्या शंकेमुळे?

मुळातच गोष्ट अशी होती, की हि शंका एका धोब्याची नव्हती. तसं असतं तर राम काही सीतेचा त्याग करणारा नव्हता. तर सर्व जनता ह्या गोष्टीविषयी लपून चापून चर्चा करताच होती. राजाचा धर्म आहे की अशा प्रत्येक गोष्टीचा नाश करा ज्यामुळे राजगादिच्या प्रतीष्ठेची हानी होत असेल. कारण राजगादीचा आदरयुक्त धाकच नसेल तर अनागोंदी माजते. आणि या बाबतीत सीता नकळत ती गोष्ट होती.

राम हा आदर्श राजा आणि पतीही होता. त्याने घेतलेला हा निर्णय काही एका क्षणात नव्हता; की ऐकलं धोब्याकडून आणि केला त्याग. त्याच्या मनात फार मोठं द्वंद्व सुरु होतं.राजा राजधर्माच पालन करण्यास सांगत होता आणि पती विरोध करत होता. पण द्वंद्वाचा निकाल एकाच असतो –विजय किंवा मृत्यू. त्यात मध्यममार्ग हा असा काही नसतोच. ह्या द्वंद्वात पती हरला आणि द्वन्द्वाच्या निकालाप्रमाणे राजा जिंकला. पण राजा जिंकला असं तरी कसं म्हणावं?

माझा आक्षेप हा आहे की ह्या द्वंद्वात राजा जिंकलाच कसा? सीता पवित्र आहे हे माहित असूनही राजा का लोकचर्चेला भ्याला? सीता त्याची प्रजा नव्हती का? डोळ्यांसमोर अन्याय दिसत असूनही कर्तव्यतत्पर राजा शांत कसा? पतीचा धर्म तरी राजा कसा विसरला? आपल्या स्रीचं मरेपर्यंत रक्षण करण्याच्या क्षपतेच काय?
पण ह्या बाबतीतही सीतेने रामाची साथ काही सोडली नाही.त्यांच्या नात्याची खोलीच अशी काही होती.ती राम दुसरं लग्न करणार नाही ह्या विषयी निश्चिंत होती. रामाने गरोदर स्रीला वनवासात पाठवण्याचा निर्णय मात्र मी पचवू शकत नाही.

त्यानंतर घ्या युधीष्टीरचं उदाहरण. जुगार खेळण्यात कसला आलाय धर्म? आणि सर्व गोष्टी हरल्यावर शकुनीने द्रौपदीला डावावर लावण्याच्या गोष्टीला युधिष्टीराने परवानगी का म्हणून दिली? हे कोणत्या धर्मात सांगितलं होतं? जेव्हा तो स्वतः डावात हरला होता, म्हणजे तो कौरवांचा दास झाला होता, मग त्याला द्रौपदीला डावावर लावण्याचा हक्क तरी कुठे होता? धर्म धर्माला कसा विसरला?

जुगाराचा नाश त्याला ह्या पातळीवर नेतो, तर त्याला मी धर्म तरी का म्हणावं? का म्हणून त्याने भीमाला आवर घातला द्रौपदी वस्त्रहरण होत असताना? युधिष्ठीर त्या क्षणी खरंच धर्माचं आचरण करु इच्छित होता की स्वतःच्या ‘धर्म’ ह्या प्रतीष्ठेला सांभाळत होता?

त्या परिस्थितीत योग्य आचरण असं कोणी केलाच नाही.मग तो फक्त युधिष्ठिराच नव्हता, भीष्मपीतमह, द्रोणहि, धृतराष्ट्र आणि इतर सभागृहातली मंडळीही आणि द्रौपदीही तितकीच चूक होती. का त्या क्षनातही द्रौपदीचा वृथा अभिमान सुटला नाही? एका हाकेची गरज असलेल्या कर्णाची तू त्या स्थितीतही अवहेलना केलीस. दानवीर म्हणवणाऱ्या कर्णा, तू तरी त्या हाकेसाठी का विसंबून राहिलास? तुझ्या मदतीच्या दानापेक्षा श्रेष्ठ दान अजून काय झाले असते? ती ‘सूतपुत्र’ म्हणून मदत नाकारेल हीच काय रे तुझी भीती होती?

द्रौपदीवर त्या सर्वांचा अधिकार नव्हता म्हणून त्यांना नजरेआड करणं एकवेळ शक्य आहे. मात्र युधिष्ठिर, तू घोर उपेक्षा केली.का तूच एकटा स्वर्गाच्या दारात जीवन्तपनी गेलास? देवालाही तू जे वागलास ते मान्य होतं, असं म्हणायचं का?

~दिग्विजय संजय पाटील
                                                                                         

Thursday 13 March 2014

हृदयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग...


लहानपणापासून राजकीय नेत्यांना, त्यांच्या लाखोंच्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या उत्साहाला, नेत्यांच्या गाडीभोवतीच्या प्रचंड ताफ्यांना पाहून मला नेहमीच अचंबा वाटत आला आहे. ही असली कोणती गोष्ट आहे जी लाखोंना वेड लावते? का काही मोजक्या मंडळींसाठी आपापसातील मित्र भांडण करतात आपला नेता श्रेष्ठ ठरवण्यासाठी?

गेल्या १० वर्षात अनेक राजकीय नेत्यांचा उदयास्त पाहायला मिळाला. बऱ्याच नेत्यांचा प्रभाव गरजेपेक्षा वाढत गेला तर काही राजकीय क्षितिजावरून दिसेनाशी झाली.

नेता बनण्यासाठी काही उदिष्ठ, मुद्दा असो अथवा नसो, मी पुढे सांगणार असलेल्या गोष्टींपैकी एक तर असणे अतीशय गरजेचे आहे. तर तुम्ही विचार करत असणार हा काय नवीन सांगणार? तर त्या गोष्टी आहेत –खिसा आणि गळा.

मतदानाच्या राजकारणात लोकांची हृदये जिंकायची असल्यास दोन मार्ग आहेत, एक तर पोटाच्या बाजूने किंवा गळ्याच्या बाजूने. ज्यांच्याकडे पैसा आहे, परिवार आहे अशी माणसे पोटामार्गे जाण्याचा रस्ता पसंत करतात. मतितार्थ हा की मते मिळवायची असल्यास पहिले लोकांची पोटे जिंकली पाहिजेत, नाही का? आपल्याकडच्या लोकांच्या अपेक्षाही फार छोट्या आणि तात्पुरत्या आहे हो! फसवली जातात म्हणण्यापेक्षा विकली लवकर जातात. पण त्यांचा एका गुणाची दाद द्यायला हवी. त्यातली बरीचशी माणसे फार इमानदार असतात. खाल्ल्या मिठाला जागतात ती!

आता दुसर्या मार्गातर्फे जाणाऱ्यांकडे पाहूया. ज्यांचा खिसा खाली आहे, त्यांना तोंडामार्फत जाण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणजे भाषणे देऊन, लोकांच्या भावना चेतवून.(भडकावून म्हणायचं होत मला इथे) सामान्य जनतेला असे तिचे स्वतःचे फार काही विचार किंवा तत्व नसतात. त्यांचे विचार आणि तत्व शाबूत आणि भक्कम आहे अशी त्यांची भाबडी समजूत मात्र नक्की असते. कोणीतरी येतं आणि उत्कृष्ठ भाषाशैलीत चार गोष्टी काय सांगतो आणि यांची मते लगेच बदलतात. शेक्सपिअरने ह्या लोकांच्या वृत्तीच अतिशय नेमकं चित्रण ज्युलियस सीझर या महान नाटकात केलाय. सीझरच्या हत्येच्या कटकर्त्यांच्या प्रभावाखाली आलेली जनता सीझर किती वाईट आणि घातक होता ही चर्चा करत होती. काही क्षणात मार्क अंटोनीने सीझरच्या समर्थनार्थ दिलेल्या उत्कृठ भाषणाच्या प्रभावाखाली येऊन तीच जनता कटकर्त्यानाही मारायला धावली. हीच लोकांची धमनी ह्या लोकांनी ओळखलीय.

शेवटी अपेक्षेपेक्षाहीपुढे पुढे तेच जाताना दिसतात ज्यांचा खिसाही भरलेला आहे आणि कंठही दृढ आहे, नाही का?


~दिग्विजय पाटील.

Tuesday 11 March 2014

चूक की अनुभव?



जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो, पण तो दुसर्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी!

तसं पाहिलं तर आयुष्य फार छोटं आहे जगातल्या सर्वच चुका स्वतःच करण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी. जी मानसं दुसर्याच्या ठेचांनी शिकतात, ती शहाणी ठरतात आणि जी म्हणतात की, 'स्वतःच्या अनुभवातून आलेलं ज्ञान सर्वश्रेष्ठ' ती अंगभर अनुभवाच्या जखमा घेऊन वावरतात.

'चुकांमधून अनुभव' हा शब्दच मुली मला स्वतःची समजूत काढण्यासाठी मढवलेला वाटतो , कारण त्याच्याशी जोडलेल्या असतात वाईट आठवणी. जीवनातल्या वाईट प्रसंगांना 'अनुभव' हे गोंडस नाव देऊन तेवढाच आपण मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.

मला सांगा कितीतरी मानसं आपल्या 'अनुभवातून' शिकून त्याच चुकीची पुनरावृत्ती करत नाहीत? फार क्वचित मानसं हो! बाकी लोकांच संपूर्ण आयुष्याच 'अनुभवांनी' भरलेलं असतं.

वेळ निघून गेल्यानंतर आलेल्या शहाणपणाची किंमतच मुळी फार कमी असते आणि जी थोडीफार असते, तिचा उपयोग तेव्हाच जेव्हा पुढच्या वेळी आपण तिचं स्मरण ठेवतो.

आपण फार विसराळू आहोत हो! कालांतराने विसरतो गोष्टी. पण चुकांना 'अनुभव' नावाचा सन्मान मिळवून द्यायचा असेल तर विसराळू होऊन काम कसे चालेल?

लहानपणपासून मनावर बिंबवल जातं की वाईट गोष्टींना विसरा, चांग्ल्यावर लक्ष केंद्रित करा. मात्र काही चांगल होण्याची अशा बाळगत असाल तर वाईट गोष्टींमधून जो 'पाठ' घेण्याची आपण मनाला तात्पुरती दिलेली समजूत असते ती तात्पुरती ह्या सदरातून आपल्याला वगळायला हवी, नाही का?

~दिग्विजय पाटील.

प्रेमयोग (Premyog) ~ कुसुमाग्रज


प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....



सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं



रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं



प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं



प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............

~कुसुमाग्रजं

Monday 10 March 2014

उपहास

भारतात ३ उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात - लग्न,वर्ल्डकप क्रिकेट आणि निवडणुका. त्यातल्यात्यात निवडणुकांचा वारा लागताच आपली जनता बेभान होते. एरवी शांत असणारी, कोणत्याही बाबतीत जे चाललंय तेच चालू देणारी, बदल ह्या शब्दालाही घाबरणारी मंडळी निवडणुका येताच त्यांच्यात एक निराळच चैतन्य दिसून येत. कदाचित तेच चैतन्य संचारल्यामुळे मी हे लिहतोय.

राजकारणात नेहमीच असे घडत आले आहे - संघर्ष वरकरणी दिसतो वैचारीक, तसा तो काही प्रमाणात असतोही. त्याचबरोबर त्याला वैयक्तिक रागलोभाचेही परीणाम लाभलेले असतात. नव्हे, मुळात तोच त्याचा गाभा असतो. कोणी त्याची कबुली देत नाही, इतकेच काय ते.




महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या ठळक ओळींना काही विशेषच महत्त्व आहे. काही वेगळी विचारधारा घेऊन राजकीय पक्ष जन्म घेतात, हि आता वेडगळ समजूत झालीय. स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांचे पंख पसरवण्यासाठीही ते जन्म घेतात, मात्र त्याच बाबतीत आपली गल्लत होते. आणि काही काळाने कळत की ज्याला आपण नवी आशा म्हणून पाहत होतो, तोही राजकारणाच्या सरबतात विरघळलाय. मात्र हे समजण्यापूर्वी फार उशीर झालेला असतो.

अमेरिकेच्या राजकारणात पहा, तेथे दोनच पक्षाचं वर्चस्व आहे- डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. किंवा इंग्लंडमधेही पहा- conservative unionist आणि labour पक्ष. भारतात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सत्तेसाठी आवश्यक निम्म्याहून अधिक संख्याबळ जमवण कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. मग ते मिळवण्यासाठी अतिशय विरुद्ध विचारधारणा असणारे पक्ष एकत्र येतात, आणि राजकीय संतुलन ढळत. राजकारण विचारधारेपासून व्यक्तीत्वाकडे जेव्हा कलणं सुरु करतं तेव्हा ते राजकारण उरत नाही, तेव्हा ते बनत सत्तारूढ होण्यासाठी इच्छुक व्यक्तींचा आपापसातील संघर्ष.

परिस्थितीवर स्वार होण्यासाठी अहंमन्य नेत्यालाही आपली पहिली कार्यशैली सोडून द्यावी लागते.हि सुध्दा गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. एकेकाळी कुणा एका समूहाचे रक्षणकर्ते म्हणवणारे, मतदाराचा कल पाहत निवडणुकीपूर्वी आपल्या भूमिकांना U-टर्न देतात. अहो पण घोषणापत्रात(manifesto) तुम्ही काहीही लिहील तरी माणूस बदलतो काय? मानसन्मान मिळवण्यापेक्षा समाजाच्या आदरास पत्र होण अधिक श्रेयस्कर असतं, हे हि मंडळी विसरतात. सत्ताअभिलाषा किंवा राज्यतृष्णा मनुष्याला आंधळ करते हि म्हण काही खोटी नाही.

भावना भडकावणारी भाषणं करण किंवा मोर्च्याच्या अग्रभागी असणं म्हणजे नेतृत्व नव्हे, तर त्या भाषणाचा किंवा त्या मोर्च्याचा उद्देश निर्मळ असणं आणि ज्या लोकांची उर्जा त्या गोष्टीसाठी खर्च होतेय त्या लोकांच्या कष्टाचं सकारात्मक फळ त्यांना मिळवून देन, याला मी नेतृत्व समजतो. त्याच नेतृत्वाची कमी आपल्याला जाणवतेय. भाषण देता येन कला आहे, आणि मुळात म्हणजे आपला समाजहि कलाप्रेमी आहे. कलेची वाहवा मोकळ्या मनाने आपण नेहमीच केली आहे. पण कलेचा उपयोग जेव्हा हिंसा करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा ती कला उरत नाही.

रूपसंपदेची महती प्रेमरंगातच प्रतीत होते असे नाही, रुक्ष राजकारणावरही ती आपला प्रभाव पाडत असते. कधी कळत, कधी नकळत. हि गोष्ट मग जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीत घ्या नाही तर सुभाषचंद्र बोसांच्या. नाहीतर सध्याचच म्हणाल तर राहुल गांधीच्या बाबतीत. अस असेल तर ४३ वर्षाच्या मनुष्यालाहि आपण तरुण म्हणण्यास कमी करत नाही, नाही का?

कृतज्ञता - गिरीश


पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरताच तडफडावे.
पाखराने एकले तडफडावे.
हळू गोंजारी सेविका दयाळू
डॉक्टराचे वच शंतवे कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न
कुठे डोळे लाउन बसे खीन्न
आणि डाक्टर येताच गोंजाराया
हाय! लागे तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकुळ फार झला
आणि पुसिलेच त्याने डाक्टरला
''आता दादा, मरणार काय मी हो?''
तोच लागे अश्रुची धार वाहो!

ह्रदय हलूणी डोळ्यात उभे पाणी
तरी डाक्टरची वदे करूण वाणी
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजरून शांतावुन जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास आता ताण
हळूच बोलावी बाळ डाक्टराला
तोही धर्मात्मा धाऊनीच आला.

आता बाळाला टोचणार तोच
वेड वासून पाखरू दीन चोच
"नको आता ! उपकार फार झाले!
तुम्ही मजला किती..गोड..वागविले!

भीत..दादा..मरणास मुळी..नाही!
तू..म्ही..आई..!!" बोलला पुढे नाही!
क्षणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचणे डाक्टराने.

-

कवी : गिरीष

Sunday 9 March 2014

लग्न, वाजंत्री, कहर

लग्न...मागच्या एका पोस्टमधेही मी याबद्दल लिहिलंय, की आपल्या समाजात ज्या गोष्टींना गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळालेलं आहे. माझा लग्नाच्या प्रथेसंबंधी राग असण्याची अनेक करणे आहेत. आमचं घर अगदी गावातल्या मुख्य रस्त्याला लागून आहे, आणि मुख्य म्हणजे घराच्या आजूबाजूला तीन मंगल कार्यालय, त्यातल्यात्यात एक अगदी घराला लागून. गावातल्या प्रसिद्ध दत्तात्रेयाच्या मंदिरापासून वरातीस सुरवात होते. आमच्या घराच्या डाव्या बाजूस मंदिर आणि बाकी सर्व विवाह मंगल कार्यालये उजव्या. त्यामुळे ज्याही वराती जातात त्या आमच्याच घरावरून. तुम्हाला कल्पना यावी यासाठी खाली हे चित्र काढलय. 



त्यात हे वाजंत्रीवाले म्हणजे कहरच. जर कधी मोठी लग्नतिथी असेल तर मग दोन ते तीन तास आमचं संपूर्ण घर ह्या वाजंत्रीच्या आवाजाने दणाणून सुटतं. पूर्वी ७-८ वर्षांपूर्वी DJ हा प्रकार अस्तित्वात नव्हता, त्याचा शोध म्हणा किंवा सार्वजनिक कार्यात वापर म्हणा, हा काळाच्या दृष्टीने उशिराच झाला तेच काय ते आमचं सुदैव. इयत्ता २री पासून ते १२वी पर्यंत सर्व परीक्षा मी ह्या वाजंत्रीच्या आवाजातच अभ्यास करून दिल्या आहेत. कारण ह्या लग्न समारंभांचा मुख्य मौसम म्हणजे डिसेंबर आणि नंतर मार्च ते जून ह्या काळातला. पहिले मी फार चिडायचो, प्रथम त्या लग्नात आनंदाने नाचनार्यांवर आणि नंतर घरातल्या मंडळींवर, की त्यांना हीच जागा सापडली होती घरासाठी? पण करणार तरी काय...वडील डॉक्टर, त्यामुळे मुख्य रस्त्याला लागून क्लिनिक आणि त्यामागे घर. पण नंतर नंतर मला सवय झाली, लग्नाच्या वराती घरावरून जात असताना सुद्धा माझ लक्ष विचलित होणं बंद झालं. याला तुम्ही एकाग्रता म्हणा किंवा सवयीचा परिणाम म्हणा, पण एकदाची सवय झाली.

लहानपणी टिळक जयंतीला एक टिळकांच्या जीवनावरील कथा म्हणून आमच्या शाळेत एक कार्यक्रम होता, त्यात एक टिळकांच्या एकाग्रतेवर गोष्ट ऐकली होती की त्याचं वाचनात इतके मग्न होत की घरावरून वाजंत्री गेली तरी त्यांचे त्याकडे लक्ष जात नसे. ही गोष्ट ऐकल्यानंतर मला काही स्वतःचा वेगळाच अभिमान वाटला होता.
मला तर स्वतःच्या लग्नात ब्राह्मणाला बोलावण्याची मुळातच गरज वाटत नाही. कारण रोजरोज ऐकून ऐकून माझ्या ती सर्व स्तोत्र-मंत्र पाठ झाली आहेत. अगदी कोणत्या क्षणाला अग्निकुंडात तूप टाकायचं, मामांना बोलावून अंतरपाट पकडायला लावून मंगलाष्टक म्हणण्यापासून, कण्यादानापर्यंतची सर्व विधी मला तोंडपाठ आहेत. अगदी हाडाचा ब्राह्मणही इतक्या लकबीने म्हणणार नाही इतक्या वाकबगार पद्धतीने मी म्हणू शकेन, याचा मला आत्मविश्वास आहे.

लग्न कार्याबद्दल आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे लग्नात जेवण द्यायचं आणि त्याचा खर्चही घ्यायचा. प्रथम मुलीवाल्यांनी हुंडा द्यायचा आणि लग्नकार्य लावण्याचीही जबाबदारीही त्यांचीच. आणि मुलवाल्यांनी यायचं आणि एक टेबल-खुर्ची लावून ‘आहेर’ म्हणून पैसे गोळा करायचे. जर नंतर पैसे गोळा करायचेच असतात तर पहिले पैसे उडवायचेच कशाला? याचं उत्तर मला काही अजून सापडलेलं नाहीये. नवरदेवाकडच्या काही म्हाताऱ्या मंडळींचं मुख्य कार्य म्हणजे लग्नात काही त्रुटी राहिल्या आहेत का आणि मानपानाची नीट व्यवस्था झालीय का ते पाहणं. मानपान म्हणजे लग्न गाड्या आल्याबरोबर त्यांच्या फराळाची नीट व्यवस्था आहे की नाही?(प्रवासचा प्रचंड थकवा आलेला असतो ना!) ज्यांचा उपवास आहे त्यांची वेगळी व्यवस्था आहे की नाही? गर्मीचा मौसम असेल तर काही थंड म्हणजे सरबत वैगरे आहे किंवा नाही? या आणि असल्या एक नाही अनेक गोष्टी. त्या जर चुकून नसतीलच तर त्या का नव्हत्या याचं विश्लेषण करणं. आणि जर त्या असतील तर त्यावर पर्याय न काढता त्या फुकट लग्नाच्या पहिल्या पंगतीत खाऊन आलेल्या शक्तीने चारचौघात बोभाटा करणं.

आमच्या घराजवळ एक मंगल कार्यालय आहे, त्याच्या मालकाची एक गमतीदार कहाणी आहे. इमानदारी म्हणून जी गोष्ट असते त्याचे अतिशय निर्मळ उदाहरण. ते मंगल कार्यालयाबरोबरच  स्वयंपाकी आणि वाढपीसुद्धा पुरवतात. तेच स्वयंपाकी लोक प्रत्येक पदार्थ एक-एक कढई भरून त्यांच्या घरी पोहोचतं करतात. जर यापुढे तुम्ही लग्नाच्या पंगतीत बसले असाल आणि कोणताही पदार्थ जर कमी पडला तर स्वयंपाक घराची तपासणी करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवरदेवाकडून असालं आणि जर हा प्रकार तुमच्या लक्षात आला तर तारसुरात खडसवन्यास बिलकुल कमी करू नका, कारण अहो दादागिरी हा तर मुलाकडच्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, नाही का?