केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||
वाकुनी अदिलशाहास कुर्निसात देऊनी
प्रलयकाळ तो प्रचंड खान निघे तेथुनी
हादरली धरणी व्योम शेषही शहारला ।।१।।
खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती
उंट हत्ती पालख्याही रांग लांब लांब ती
टोळधाड हि निघे स्वतंत्रता गिळायला ।।२।।
तुळजापूरची भवानी माय महन्मंगला
राऊळात अधम खान दैत्यांसह पोचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ।।३।।
सावधान हो शिवा वैऱ्याची रात्र ही
काळ येतसे समोर साध वेळ तूच ही
देउनी बळी अजास तोषवी भवानीला ।।४।।
श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले
रक्त तापले कराल खडग सज्ज जाहले
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ।।५।।
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या,
यवन हत्ती मर्दण्यास सह्य सिंह चालला ।।धृ०।।
सज्ज होऊनि सशस्त्र वीर चालला रणी
शक्ती भक्ती एकवटुनि माय मनी पूजुनी
दे भवानी आज वज्र देई कवच कुंडला ।।६।।
झेप घेऊनि उठे वीरभद्र खवळुनी
कृतांत काळ तो निघे रुद्रशंख फुंकूनी
जाहल्या तुतारी भेरी दुंदुभी निनादल्या ।।७।।
खान हासला मनी शिवा समोर पाहुनी
राष्ट्रप्राण वेढीला मिठी अजस्त्र घालुनी
जाहला कट्यार वार कृष्ण सर्प दंशला ।।८।।
बगल देऊनि क्षणात मगरमिठी तोडली
वज्रमुष्ठी उघडुनि व्याघ्रनखें खुपसली
चित्कारत या अल्ला खान भूमी लोळला ।।९।।
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला ।।धृ०।।
तृप्त जाहली भवानी यवन रक्त प्राशुनी
उठती गर्जना हरहर महादेव त्रिभुवनी
हे अजिंक्य हिंदुराष्ट्र दशदिशा निनादल्या ।।१०।।
– अनामिक