Pages

Friday 21 March 2014

राम आणि युधिष्ठीर


राम –मर्यादापुरुषोत्तम, आज्ञाधारक मुलगा, महान योद्धा, उत्तम राजा, प्रजेचा लाडका.
युधिष्ठीर –धर्माच्या आचरणात कधीही कसूर न करणारा.
असे जगावेगळे सर्व गुण असताना मला खटकते ती एक गोष्ट. दोन्हींनी आपल्या स्री वर अन्याय केला. धर्माच्या दृष्टीने तुम्ही कितीही वादविवाद करून तुमची बाजू मांडा, पण मला दोन्ही स्रीयांवर अन्याय झाल्यासारखा वाटतो.

का म्हणून मार्यादापुरुषोत्तम रामाने सीतेला अग्निपरीक्षेतून जायला लावलं? मुळातच रामाचा जर कोणावर जास्त विश्वास होता, ती होती सीता. त्याला मुळातच तिच्यावर काडीमात्र संशय नव्हता. पण माझा प्रश्न हा आहे की, का म्हणून समाजाच्या होऊ शकणार्या उपेक्षेला राजा भ्यायला? का म्हणून सर्वांचा आदर्श असलेल्या रामाने सीतेला अग्निदिव्यातून जायला लावले? एवढयावरच गोष्ट संपली असती तरी मी मानली असती तुमची बाजू. मात्र पुन्हा सीतेचा त्याग. त्याही एका यःकिंचित धोब्याने उत्पन्न केलेल्या शंकेमुळे?

मुळातच गोष्ट अशी होती, की हि शंका एका धोब्याची नव्हती. तसं असतं तर राम काही सीतेचा त्याग करणारा नव्हता. तर सर्व जनता ह्या गोष्टीविषयी लपून चापून चर्चा करताच होती. राजाचा धर्म आहे की अशा प्रत्येक गोष्टीचा नाश करा ज्यामुळे राजगादिच्या प्रतीष्ठेची हानी होत असेल. कारण राजगादीचा आदरयुक्त धाकच नसेल तर अनागोंदी माजते. आणि या बाबतीत सीता नकळत ती गोष्ट होती.

राम हा आदर्श राजा आणि पतीही होता. त्याने घेतलेला हा निर्णय काही एका क्षणात नव्हता; की ऐकलं धोब्याकडून आणि केला त्याग. त्याच्या मनात फार मोठं द्वंद्व सुरु होतं.राजा राजधर्माच पालन करण्यास सांगत होता आणि पती विरोध करत होता. पण द्वंद्वाचा निकाल एकाच असतो –विजय किंवा मृत्यू. त्यात मध्यममार्ग हा असा काही नसतोच. ह्या द्वंद्वात पती हरला आणि द्वन्द्वाच्या निकालाप्रमाणे राजा जिंकला. पण राजा जिंकला असं तरी कसं म्हणावं?

माझा आक्षेप हा आहे की ह्या द्वंद्वात राजा जिंकलाच कसा? सीता पवित्र आहे हे माहित असूनही राजा का लोकचर्चेला भ्याला? सीता त्याची प्रजा नव्हती का? डोळ्यांसमोर अन्याय दिसत असूनही कर्तव्यतत्पर राजा शांत कसा? पतीचा धर्म तरी राजा कसा विसरला? आपल्या स्रीचं मरेपर्यंत रक्षण करण्याच्या क्षपतेच काय?
पण ह्या बाबतीतही सीतेने रामाची साथ काही सोडली नाही.त्यांच्या नात्याची खोलीच अशी काही होती.ती राम दुसरं लग्न करणार नाही ह्या विषयी निश्चिंत होती. रामाने गरोदर स्रीला वनवासात पाठवण्याचा निर्णय मात्र मी पचवू शकत नाही.

त्यानंतर घ्या युधीष्टीरचं उदाहरण. जुगार खेळण्यात कसला आलाय धर्म? आणि सर्व गोष्टी हरल्यावर शकुनीने द्रौपदीला डावावर लावण्याच्या गोष्टीला युधिष्टीराने परवानगी का म्हणून दिली? हे कोणत्या धर्मात सांगितलं होतं? जेव्हा तो स्वतः डावात हरला होता, म्हणजे तो कौरवांचा दास झाला होता, मग त्याला द्रौपदीला डावावर लावण्याचा हक्क तरी कुठे होता? धर्म धर्माला कसा विसरला?

जुगाराचा नाश त्याला ह्या पातळीवर नेतो, तर त्याला मी धर्म तरी का म्हणावं? का म्हणून त्याने भीमाला आवर घातला द्रौपदी वस्त्रहरण होत असताना? युधिष्ठीर त्या क्षणी खरंच धर्माचं आचरण करु इच्छित होता की स्वतःच्या ‘धर्म’ ह्या प्रतीष्ठेला सांभाळत होता?

त्या परिस्थितीत योग्य आचरण असं कोणी केलाच नाही.मग तो फक्त युधिष्ठिराच नव्हता, भीष्मपीतमह, द्रोणहि, धृतराष्ट्र आणि इतर सभागृहातली मंडळीही आणि द्रौपदीही तितकीच चूक होती. का त्या क्षनातही द्रौपदीचा वृथा अभिमान सुटला नाही? एका हाकेची गरज असलेल्या कर्णाची तू त्या स्थितीतही अवहेलना केलीस. दानवीर म्हणवणाऱ्या कर्णा, तू तरी त्या हाकेसाठी का विसंबून राहिलास? तुझ्या मदतीच्या दानापेक्षा श्रेष्ठ दान अजून काय झाले असते? ती ‘सूतपुत्र’ म्हणून मदत नाकारेल हीच काय रे तुझी भीती होती?

द्रौपदीवर त्या सर्वांचा अधिकार नव्हता म्हणून त्यांना नजरेआड करणं एकवेळ शक्य आहे. मात्र युधिष्ठिर, तू घोर उपेक्षा केली.का तूच एकटा स्वर्गाच्या दारात जीवन्तपनी गेलास? देवालाही तू जे वागलास ते मान्य होतं, असं म्हणायचं का?

~दिग्विजय संजय पाटील
                                                                                         

No comments:

Post a Comment