Pages

Thursday 13 March 2014

हृदयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग...


लहानपणापासून राजकीय नेत्यांना, त्यांच्या लाखोंच्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या उत्साहाला, नेत्यांच्या गाडीभोवतीच्या प्रचंड ताफ्यांना पाहून मला नेहमीच अचंबा वाटत आला आहे. ही असली कोणती गोष्ट आहे जी लाखोंना वेड लावते? का काही मोजक्या मंडळींसाठी आपापसातील मित्र भांडण करतात आपला नेता श्रेष्ठ ठरवण्यासाठी?

गेल्या १० वर्षात अनेक राजकीय नेत्यांचा उदयास्त पाहायला मिळाला. बऱ्याच नेत्यांचा प्रभाव गरजेपेक्षा वाढत गेला तर काही राजकीय क्षितिजावरून दिसेनाशी झाली.

नेता बनण्यासाठी काही उदिष्ठ, मुद्दा असो अथवा नसो, मी पुढे सांगणार असलेल्या गोष्टींपैकी एक तर असणे अतीशय गरजेचे आहे. तर तुम्ही विचार करत असणार हा काय नवीन सांगणार? तर त्या गोष्टी आहेत –खिसा आणि गळा.

मतदानाच्या राजकारणात लोकांची हृदये जिंकायची असल्यास दोन मार्ग आहेत, एक तर पोटाच्या बाजूने किंवा गळ्याच्या बाजूने. ज्यांच्याकडे पैसा आहे, परिवार आहे अशी माणसे पोटामार्गे जाण्याचा रस्ता पसंत करतात. मतितार्थ हा की मते मिळवायची असल्यास पहिले लोकांची पोटे जिंकली पाहिजेत, नाही का? आपल्याकडच्या लोकांच्या अपेक्षाही फार छोट्या आणि तात्पुरत्या आहे हो! फसवली जातात म्हणण्यापेक्षा विकली लवकर जातात. पण त्यांचा एका गुणाची दाद द्यायला हवी. त्यातली बरीचशी माणसे फार इमानदार असतात. खाल्ल्या मिठाला जागतात ती!

आता दुसर्या मार्गातर्फे जाणाऱ्यांकडे पाहूया. ज्यांचा खिसा खाली आहे, त्यांना तोंडामार्फत जाण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणजे भाषणे देऊन, लोकांच्या भावना चेतवून.(भडकावून म्हणायचं होत मला इथे) सामान्य जनतेला असे तिचे स्वतःचे फार काही विचार किंवा तत्व नसतात. त्यांचे विचार आणि तत्व शाबूत आणि भक्कम आहे अशी त्यांची भाबडी समजूत मात्र नक्की असते. कोणीतरी येतं आणि उत्कृष्ठ भाषाशैलीत चार गोष्टी काय सांगतो आणि यांची मते लगेच बदलतात. शेक्सपिअरने ह्या लोकांच्या वृत्तीच अतिशय नेमकं चित्रण ज्युलियस सीझर या महान नाटकात केलाय. सीझरच्या हत्येच्या कटकर्त्यांच्या प्रभावाखाली आलेली जनता सीझर किती वाईट आणि घातक होता ही चर्चा करत होती. काही क्षणात मार्क अंटोनीने सीझरच्या समर्थनार्थ दिलेल्या उत्कृठ भाषणाच्या प्रभावाखाली येऊन तीच जनता कटकर्त्यानाही मारायला धावली. हीच लोकांची धमनी ह्या लोकांनी ओळखलीय.

शेवटी अपेक्षेपेक्षाहीपुढे पुढे तेच जाताना दिसतात ज्यांचा खिसाही भरलेला आहे आणि कंठही दृढ आहे, नाही का?


~दिग्विजय पाटील.

No comments:

Post a Comment