Pages

Sunday 9 March 2014

लग्न, वाजंत्री, कहर

लग्न...मागच्या एका पोस्टमधेही मी याबद्दल लिहिलंय, की आपल्या समाजात ज्या गोष्टींना गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळालेलं आहे. माझा लग्नाच्या प्रथेसंबंधी राग असण्याची अनेक करणे आहेत. आमचं घर अगदी गावातल्या मुख्य रस्त्याला लागून आहे, आणि मुख्य म्हणजे घराच्या आजूबाजूला तीन मंगल कार्यालय, त्यातल्यात्यात एक अगदी घराला लागून. गावातल्या प्रसिद्ध दत्तात्रेयाच्या मंदिरापासून वरातीस सुरवात होते. आमच्या घराच्या डाव्या बाजूस मंदिर आणि बाकी सर्व विवाह मंगल कार्यालये उजव्या. त्यामुळे ज्याही वराती जातात त्या आमच्याच घरावरून. तुम्हाला कल्पना यावी यासाठी खाली हे चित्र काढलय. 



त्यात हे वाजंत्रीवाले म्हणजे कहरच. जर कधी मोठी लग्नतिथी असेल तर मग दोन ते तीन तास आमचं संपूर्ण घर ह्या वाजंत्रीच्या आवाजाने दणाणून सुटतं. पूर्वी ७-८ वर्षांपूर्वी DJ हा प्रकार अस्तित्वात नव्हता, त्याचा शोध म्हणा किंवा सार्वजनिक कार्यात वापर म्हणा, हा काळाच्या दृष्टीने उशिराच झाला तेच काय ते आमचं सुदैव. इयत्ता २री पासून ते १२वी पर्यंत सर्व परीक्षा मी ह्या वाजंत्रीच्या आवाजातच अभ्यास करून दिल्या आहेत. कारण ह्या लग्न समारंभांचा मुख्य मौसम म्हणजे डिसेंबर आणि नंतर मार्च ते जून ह्या काळातला. पहिले मी फार चिडायचो, प्रथम त्या लग्नात आनंदाने नाचनार्यांवर आणि नंतर घरातल्या मंडळींवर, की त्यांना हीच जागा सापडली होती घरासाठी? पण करणार तरी काय...वडील डॉक्टर, त्यामुळे मुख्य रस्त्याला लागून क्लिनिक आणि त्यामागे घर. पण नंतर नंतर मला सवय झाली, लग्नाच्या वराती घरावरून जात असताना सुद्धा माझ लक्ष विचलित होणं बंद झालं. याला तुम्ही एकाग्रता म्हणा किंवा सवयीचा परिणाम म्हणा, पण एकदाची सवय झाली.

लहानपणी टिळक जयंतीला एक टिळकांच्या जीवनावरील कथा म्हणून आमच्या शाळेत एक कार्यक्रम होता, त्यात एक टिळकांच्या एकाग्रतेवर गोष्ट ऐकली होती की त्याचं वाचनात इतके मग्न होत की घरावरून वाजंत्री गेली तरी त्यांचे त्याकडे लक्ष जात नसे. ही गोष्ट ऐकल्यानंतर मला काही स्वतःचा वेगळाच अभिमान वाटला होता.
मला तर स्वतःच्या लग्नात ब्राह्मणाला बोलावण्याची मुळातच गरज वाटत नाही. कारण रोजरोज ऐकून ऐकून माझ्या ती सर्व स्तोत्र-मंत्र पाठ झाली आहेत. अगदी कोणत्या क्षणाला अग्निकुंडात तूप टाकायचं, मामांना बोलावून अंतरपाट पकडायला लावून मंगलाष्टक म्हणण्यापासून, कण्यादानापर्यंतची सर्व विधी मला तोंडपाठ आहेत. अगदी हाडाचा ब्राह्मणही इतक्या लकबीने म्हणणार नाही इतक्या वाकबगार पद्धतीने मी म्हणू शकेन, याचा मला आत्मविश्वास आहे.

लग्न कार्याबद्दल आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे लग्नात जेवण द्यायचं आणि त्याचा खर्चही घ्यायचा. प्रथम मुलीवाल्यांनी हुंडा द्यायचा आणि लग्नकार्य लावण्याचीही जबाबदारीही त्यांचीच. आणि मुलवाल्यांनी यायचं आणि एक टेबल-खुर्ची लावून ‘आहेर’ म्हणून पैसे गोळा करायचे. जर नंतर पैसे गोळा करायचेच असतात तर पहिले पैसे उडवायचेच कशाला? याचं उत्तर मला काही अजून सापडलेलं नाहीये. नवरदेवाकडच्या काही म्हाताऱ्या मंडळींचं मुख्य कार्य म्हणजे लग्नात काही त्रुटी राहिल्या आहेत का आणि मानपानाची नीट व्यवस्था झालीय का ते पाहणं. मानपान म्हणजे लग्न गाड्या आल्याबरोबर त्यांच्या फराळाची नीट व्यवस्था आहे की नाही?(प्रवासचा प्रचंड थकवा आलेला असतो ना!) ज्यांचा उपवास आहे त्यांची वेगळी व्यवस्था आहे की नाही? गर्मीचा मौसम असेल तर काही थंड म्हणजे सरबत वैगरे आहे किंवा नाही? या आणि असल्या एक नाही अनेक गोष्टी. त्या जर चुकून नसतीलच तर त्या का नव्हत्या याचं विश्लेषण करणं. आणि जर त्या असतील तर त्यावर पर्याय न काढता त्या फुकट लग्नाच्या पहिल्या पंगतीत खाऊन आलेल्या शक्तीने चारचौघात बोभाटा करणं.

आमच्या घराजवळ एक मंगल कार्यालय आहे, त्याच्या मालकाची एक गमतीदार कहाणी आहे. इमानदारी म्हणून जी गोष्ट असते त्याचे अतिशय निर्मळ उदाहरण. ते मंगल कार्यालयाबरोबरच  स्वयंपाकी आणि वाढपीसुद्धा पुरवतात. तेच स्वयंपाकी लोक प्रत्येक पदार्थ एक-एक कढई भरून त्यांच्या घरी पोहोचतं करतात. जर यापुढे तुम्ही लग्नाच्या पंगतीत बसले असाल आणि कोणताही पदार्थ जर कमी पडला तर स्वयंपाक घराची तपासणी करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवरदेवाकडून असालं आणि जर हा प्रकार तुमच्या लक्षात आला तर तारसुरात खडसवन्यास बिलकुल कमी करू नका, कारण अहो दादागिरी हा तर मुलाकडच्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, नाही का?

No comments:

Post a Comment