Pages

Thursday 12 April 2018

एक हास्य!! - जागृती पाटील

"एक हास्य" ही माझ्या बहिणीने आमच्या आईसाठी बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या वाढदिवसाला लिहिलेली कविता. अतिशय साध्या सोप्या शब्दात मनापासून लिहिलेली ही कविता आज अचानक मला सापडली, म्हणून इथे post करतोय. 
------------------------------------------------------------------------------------------------------------------ 
एका हास्यात सामावले माझे जग,
एका हास्यासाठी आतुरले माझे मन,
एक हास्य असावे बोलके,
एक हास्य असावे अबोल करणारे...

एक हास्य असावे असंख्य कविता करणारे,
एक हास्य असावे वाऱ्यालाही नि:शब्द करणारे,
एक हास्य असावे चैतन्य निर्माण करणारे,
एक हास्य असावे समुद्रातही लहरी निर्माण करणारे...

एक हास्य असावे हजारो मन जिंकणारे,
एक हास्य असावे ब्रम्हकमलाप्रमाणे
सर्वांना आतुरता लावणारे,
एक हास्य असावे अमृताप्रमाणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे...

एक हास्य असावे देवालाह मोहिनी घालणारे,
एक हास्य असावे देवांच्या देवावर राज्य करणारे,
एक हास्य असावे गुलाबालाही हर्षित करणारे,
एक हास्य असावे जग जिंकणारे...

एक हास्य असे असावे कि जगज्जेत्यालाही
ते हास्य नसताना पराभवाचा भास देणारे,
एक हास्य असावे चंद्रालाही मधुसुधेचा आभास देणारे,
एक हास्य असावे दुपारच्या रखरखत्या उन्हात आल्हाद देणारे,
एक हास्य असावे जग जिंकणारे आणि ते नसताना जग हरल्यासारखे वाटणारे

ते हास्य असते फक्त आईचे,
जिच्या हास्यात सामावले असते सारे जग,
त्याच हास्यासाठी सामावले माझे जग,
त्याच हास्यासाठी आतुरले माझे मन!!

**जागृती पाटील

No comments:

Post a Comment