Pages

Thursday 19 April 2018

देव कुठं आहे?


पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी
एखाद्या वडापिंपळाखाली पडीक असायचास,
देव नाही, फकीर वाटायचास,
दगडी नाही, जिवंत दिसायचास |

येता जाता लोक तुझ्या शेजारीच घडीभर विसावायचे,
शिदोरी उघडून दोन घास स्वतः खायचे,
दोन घास तुला द्यायचे.
म्हणजे कसं की देवाणघेवाण असायची
म्हणजे कसं की एक आदानप्रदान असायचं |

तसं तर तेव्हाही तू शेंदरी रंगाचे वैगरे डगले घालायचास,
पण कसं की वेषांतर केलेला राजा वाटायचास,
थेट प्रजेत मिळून मिसळून वावरायचास,
कसं की त्या निमित्ताने तुझ्याही कानावर यायचा रयतेचा हालहवाल,
आमचं सुखदु:ख हाच तुझा अबीर गुलाल |

म्हणजे कसं की तुझ वेगळेपण तेव्हाही लपून राहायचं नाही,
पण कसं की आपुलकीच्या निर्झरातून कोरडेपण वाहायचं नाही,
कधीही बघू शकायचो तुझ्या डोळ्याला डोळा भिडवून.
वेळ वखत काही काही बंधन नव्हतं
तुही सगळ्यांना सामावून घ्यायचास,
डोळ्यात तुझ्या ‘मी’ पण नव्हतं

म्हणजे कसं की ते मी पण आता तुझ्यात आलंय
असं मुळीच नाही म्हणायचय,
पण कसं की हल्ली भेटतच नाहीस मुळी उराउरी
म्हणजे मग एखाद्याने काय समजायचं |

म्हणजे कसं की विनोदीच होऊन बसलंय सगळं
बघ ना म्हणजे कसं की विनोदीच होऊन बसलंय सगळं
आपल्या दोघांनाही भेटीची ओढ आहे
मधलाच कुणीतरी मनावर घेत नाही,
आम्हाला आत जाता येत नाही
तुला बाहेर येता येत नाही |

की पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी
एखाद्या वडापिंपळाखाली पडीक असायचास,
देव नाही, फकीर वाटायचास,
दगडी नाही, जिवंत दिसायचास

तुलाही राजमहालात जायचं नसावं
पण तू राहायला गेलायेस हे मात्र खरं
मग आम्हीपण जरा बुजाल्यागत झालो
म्हटलं आपण बरं आपलं सुखदु:ख बरं

पूर्वी कसं की तू-आम्ही
म्हणजे कसं की राजा-रयत—हालहवाल
म्हणजे कसं की आमचं सुखदु:ख तुझा अबीर-गुलाल
म्हणजे कसं की निर्झर ओलावा
आता कसं की मिरवणूक देखावा
म्हणजे कसं की जयघोष कल्लोळ
म्हणजे कसं की देवस्थान मंडळ घोळ

पूर्वी कसं की तु-आम्ही-आपणच फक्त
आता कसं की डोळाभरून बघण्यावरही पहारा असतो सख्त

म्हणजे कसं की, पूर्वी कसं की, आता कसं की
थोडक्यात असंय बघ सगळं ||

** वैभव जोशी

No comments:

Post a Comment