Pages

Tuesday 19 November 2019

आम्ही कोण? - मूळ कविता आणि तिचे विडंबन

आम्ही कोण? - केशवसुत 


आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥

सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥

आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥

मूळ कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत


विडंबन 'आम्ही कोण' ह्या कवितेचे - प्र. के. अत्रे




'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - प्र. के. अत्रे (झेंडूची फुले ह्या कविता संग्रहातून)
[केशवसुत यांच्या "आम्ही कोण?" या कवितेचे विडंबन]

1 comment:

  1. आवडल्या दोन्ही कविता धन्यवाद.

    ReplyDelete