Pages

Tuesday 19 November 2019

'माझे जीवन गाणे' आणि त्याचे विडंबन 'माझे जीवन खाणे '

माझे जीवन गाणे
- मंगेश पाडगावकर



माझे जीवन गाणे, गाणे || धृ ||

व्यथा असो, आनंद असू दे |

प्रकाश किंवा तिमिर असू दे ||

वाट दिसो, अथवा ना दिसू दे |

गात पुढे मज जाणे || १ ||


कधी ऐकतो गीत झर्‍यांतुन |

वंशवनाच्या कधी मनांतुन ||

कधि वार्‍यांतुन, कधि तार्‍यांतुन |

झुळझुळताती तराणे || २ ||


तो लीलाघन स्तय चिरंतन |

फुलापरी उमले गीतांतुन ||

स्वरास्वरांतुन आनंदाचे |

नित्य नवे नजराणे || ३ ||


गा विहगांनो माझ्यासंगे |

स्वरांवरि हा जीव तरंगे ||

तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन |

उसळे प्रेम दिवाणे || ४ ||


माझे जीवन खाणे (माझे जीवन गाणे चे विडंबन)
- प्रभाकर बोकील, मुंबई


माझे जीवन खाणे, खाणे || धृ ||


पथ्य असो, उपवास असू दे |

प्रकार इतुके, फिकिर नसू दे ||

वाट असो, वा ताठ 'उभ्याने' |

खात निरंतर रहाणे || १ ||


कधी झोडतो, पंचपक्वान्ने |

दंश जिभेला, कधी ठेच्यातून ||

कधी भज्यांतून, कधी वड्यांतून |

विरघळतात 'बहाणे'! || २ ||


खा, जन खा हो, माझ्यासंगे |

जिव्हेवरी हा, जीव तरंगे ||

तुमच्या मुखी, रसस्वादसुखाचे |

उसळो खाद्य-तराणे || ३ ||

No comments:

Post a Comment