Pages

Tuesday 19 November 2019

तिची का रंगते मेंदी - वैभव जोशी


तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा
तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा

जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता
जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता,
कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला
मनाचा एक कप्पा राखलेला... आपलासा

कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे
कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे,
कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे
जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा

किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी
असे जखडून नेले ती जणू की "बंदिनी",
तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा.


कवी - वैभव जोशी

No comments:

Post a Comment